बनावट मोबाईलचा खेळ सीसीटीव्हीने उधळला
१८ हजारांचा विवो दाखवून केली फसवणूक; शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करत एक लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
शिक्रापूर दि. १६
‘विवो कंपनीचा मोबाईल असल्याचे भासवून बनावट मोबाईलची विक्री करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
अशोक भीमराव जाधव (वय ४१, रा.रामलिंग, ता.शिरूर( मूळ रा.तिखी जि.धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथील विशाल विश्व सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. प्रांजल विजय मोहतुरे आणि पुष्पेंद्र छत्रीआ यांच्याशी आरोपीने संपर्क साधला. विवो कंपनीचे मोबाईल असल्याचे सांगत त्याने लोणावळ्यातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची पावती दाखवली. पावती दाखवून मोबाईल अस्सल असल्याचा विश्वास निर्माण केल्यानंतर मोहतुरे यांना १८ हजार रुपये, तर छत्रीआ यांना सात हजार रुपयांना मोबाईल विकण्यात आला. मात्र मोबाईल बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत अशोक जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीने अशाच पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, तसेच या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी तसेच रोहीदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, किरण ढुके, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे व भारत भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.







