ऊस गाळून साखर विकली, तिजोऱ्या भरल्या, पण दुष्काळात जळालेल्या शेतकऱ्याच्या हातात द्यायला पैसेच नाहीत का.??शेतकऱ्यांचा सवाल..
तळेगाव ढमढेरे,
प्रतिनिधी: घनश्याम तोडकर
पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड आंबेगाव तालुक्यामधील खाजगी साखर कारखान्यांनी युती करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार समोर येत आहे मागील गाळप हंगाम २०२५-२६ मधील शेवटचा हप्ता म्हणून दिवाळीपूर्वी प्रतिटन शंभर-दोनशे रुपये तरी मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र दिवाळी सण तोंडावर आला असतानाही अद्याप खाजगी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड आणि आंबेगाव तालुक्यांमधील व्यंकटेश शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, पराग आणि भीमा पाटस या खाजगी कारखान्यांकडून शेवटच्या हप्त्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. शंभर-दोनशे रुपयांची चर्चा होती, मात्र आता त्या चर्चेलाही कारखान्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. अशा परिस्थितीत मागील हंगामातील उसाचे पैसे हाच दिवाळीसाठीचा एकमेव आधार होता. तोही हातात न आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
एफआरपी दिल्याचा दावा, मात्र दरात मोठी तफावत
दुसरीकडे, एफआरपीप्रमाणे मागील हंगामातील शेतकऱ्यांना पेमेंट दिले असल्याचे कारखानदारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखाने यांच्यामध्ये ऊस दरामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ५०० रुपये अंतिम बिलापोटी सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत, तर भीमाशंकर कारखान्याने प्रतिटन १७७ रुपये अंतिम हप्त्यापोटी दिले आहेत. याच्या तुलनेत खाजगी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने खाजगी कारखान्यांकडून शेतकऱ्याची क्रूर थट्टा केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर-सांगलीत आंदोलन, पुण्यात शांतता का?
एकीकडे कोल्हापूर-सांगली भागात शेतकरी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
मात्र पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते कारखानदारांशी भांडताना अथवा आंदोलन, उपोषण करताना दिसत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामागचे गुपित काय, असा सवालही ऊस उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
दिवाळीपूर्वी खाजगी कारखाने शेवटचा हप्ता जाहीर करतात का, की शेतकऱ्यांची दिवाळी कोरडीच जाणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






