अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपीला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
तळेगाव ढमढेरे
प्रतिनिधी – घनश्याम तोडकर
लाखोंची गुंतवणूक करा आणि दरमहा ८ ते ९ टक्के परतावा मिळवा, या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिस-पे फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे कार्यरत असणारे तलाठी दशरथ विठ्ठल रोडे (रा. वडाळी रोड, श्रीगोंदा याला श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली आहे. त्याला श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मेहेर यांच्या पथकाने केली आहे.
सिस-पे (CIS Pay), इन्विनेस्टो, बिगबॉक्स, ग्लोबल ट्रेडिंग या कंपन्यांच्या माध्यमातून अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक गोळा करण्यात आली होती. सुरुवातीला काही काळ परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर गुंतवणूकदारांचा कोट्यवधींचा निधी घेऊन फरार होण्यात आले होते.
या प्रकरणी १९ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ७ जुलै रोजी रंगनाथ तुळशीराम गलांडे आणि अनिल झुंबर दरेकर यांना अटक करण्यात आली. २८ ऑगस्ट रोजी तिसरा आरोपी पांडुरंग किसन खामकर याला वडगाव शेरी पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबरच आत्तापर्यंत९८ जणांना आरोपी करण्यात आले आहे
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी
गुंतवणूकदारांची फसवलेली रक्कम वसूल करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने ११५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून मालमत्तांवर शासनाचे नाव नोंदविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
तपासात आणखी मालमत्ता समोर आल्याने आर्थिक गुन्हे शाखेने आणखी ६० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीचा दुसरा पुरवणी प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
गुंतवणूकदारांची रक्कम कधी परत मिळणार?
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष रक्कम कधी वसूल होणार आणि कधी परत मिळणार याकडे हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे,






