तळेगाव ढमढेरे, दि. १० : प्रतिनिधी घनश्याम तोडकर
मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारी ऐतिहासिक भूमी म्हणजे तळेगाव ढमढेरे हे गाव आहे. इतिहासाच्या विविध घडामोडींची साक्षीदार म्हणून ही भूमी कायमच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पद्माकर गोरे लिखित आणि सनय प्रकाशन निर्मित “तळेगाव ढमढेरे गावचा इतिहास” या ग्रंथाचे प्रकाशन आज डॉ. कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक
महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. शामराव लवांडे, बाळासाहेब नरके, विश्वास ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते, संचालक विजयराव ढमढेरे, महेशबापू ढमढेरे, माजी सरपंच अनिल भुजबळ, मार्केट कमिटीचे संचालक सुदीप गुंदेचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, इतिहास मांडणे आणि इतिहास लपवणे ही समस्या आहेच. सोयीच्या अंगाने इतिहास सांगण्यापेक्षा इतिहासातील वास्तव परखडपणे समाजासमोर आणणे गरजेचे असल्याचे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. समाजसुधारक, वीरपुरुष आणि क्रांतिकारकांनी जर तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यागाच्या भावनेतून समाज उद्धारासाठी समर्पण दिले नसते तर आजच्या महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती याची कल्पनाच करू शकत नसल्याचे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.
सोयीच्या अंगाने जेव्हा पुरुषप्रधान इतिहास लिहीला गेला तेव्हा समस्त महिला वर्गावर अन्यायाच होत गेला. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रगतीसाठी भरीव कार्य केले. केवळ मुलींची शाळाच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन फुले दांपत्याने भरीव असे सामाजिक कार्य केलेले आहे. तळेगाव ढमढेरे गावात देखील त्यांनी सामाजिक बंड केले. त्यामुळेच समाजसुधारणेच्या चळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्याचे मोठे कार्य महात्मा फुले यांनी केले. तत्कालीन परिस्थितीमध्ये खरी शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती महात्मा फुले यांनीच. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्यशोधक समाजाच्या निर्मितीसाठी महात्मा फुले यांनी मोठे कार्य केले. गुलामगिरीच्या जोखडातून समाजातील मोठ्या वर्गाला बाहेर काढण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरांनी केलेले कार्य अनन्यसाधारण असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
तळेगाव ढमढेरे ही भूमी इतिहासाच्या विविध घटना घडामोडीची साक्षीदार आहे. हा इतिहास कायम प्रेरणा देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तळेगांव ढमढेरे गावचा इतिहास या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. पद्माकर गोरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथ निर्मितीमागील प्रेरणा आणि उद्देश डॉ. गोरे यांनी यावेळी स्पष्ट केला.
इतिहास विभागातील डॉ. शाकुराव कोरडे यांनी सूत्रसंचालन तर मोहन ओमासे यांनी आभार प्रदर्शन केले.
……………………………….







