पुरंदर प्रतिनिधी : निलेश भुजबळ
भागीरथी लेडीज स्पेशल ड्राय क्लीनर्स, कला सिद्धी नृत्यालय आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर-सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावण महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या या महोत्सवाने महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देत महिला शक्तीचा जागर केला.
सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात पारंपरिक कला, संस्कृती आणि सौंदर्याचे दर्शन घडले.
या कार्यक्रमास रश्मी बागल-कोलते तसेच झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतील बालकलाकार क्रिशा काकडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
चौकट…..
पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा
महोत्सवात आयोजित ‘मिस पुरंदर क्वीन २०२६’ स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी येथील तेजश्री काठूराम झुरंगे हिने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब आपल्या नावावर केला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, आकर्षक पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर तिने हे यश मिळवले. तिच्या या यशासाठी मेकअप आर्टिस्ट अश्विनी राऊत यांनी विशेष मेहनत घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तेजश्रीने शिक्षणासोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली असून तिच्या यशामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.
तर ‘मिसेस पुरंदर क्वीन २०२६’चा मान आरती ठवाळ यांनी पटकाविला.
लहान मुलांसाठी झालेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत मुलांच्या गटात बालाजीच्या वेशभूषेतील कृष्णा खिलारी याने, तर मुलींच्या गटात कालिका मातेच्या वेशभूषेतील अलंक्रीता सायजू हिने प्रथम क्रमांक मिळविला.
चौकट….
आदिशक्ती पुरस्काराने गौरव
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. रेश्मा पवार, डीवायएसपी रश्मी सावंत आणि फार्मसी अभ्यासक्रमात महाराष्ट्रात प्रथम आलेल्या साक्षी टिळेकर यांना मानाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवातील लकी ड्रॉमध्ये पाच भाग्यवान महिलांना पैठणी साड्या देण्यात आल्या. तसेच जेजुरी येथील नवदुर्गा महिला मंडळाने मंगळागौरीचे पारंपरिक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेचे परीक्षण स्नेहा संकाये, मनीषा हिंगे आणि ललिता काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम जगताप, लीना वढणे, धनश्री वढणे, स्वाती होले, इशा लोखंडे, वैशाली टपळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किशोरी पवार, स्वानंद लोमटे आणि सपना पवार यांनी केले.
तेजश्री झुरंगे हिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



