पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव शाळेच्या दारात; मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य; गुन्हा घडल्यानंतर कारवाईपेक्षा प्रतिबंधावर भर
शिक्रापूर, दि.१२
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ गुन्हा घडल्यानंतर पोलिसांच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता, गैरप्रकार घडण्याआधीच त्याला आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी शाळेच्या दारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः शाळा-महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थिनींशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
यादव यांनी विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर, न्यू इंग्लिश स्कूल धामारी तसेच सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालय, कासारी या शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. दि. १२ रोजी वढू बुद्रुक येथील धर्मवीर शंभूराजे भोसले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातही विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींना 'गुड टच-बॅड टच', छेडछाड, पाठलाग, अश्लील शेरेबाजी, धमकी, सोशल मीडियावरून होणारा त्रास, अनोळखी व्यक्तींशी संपर्क तसेच बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देण्यात आली. त्रास सहन करण्याऐवजी किंवा भीतीपोटी घटना लपविण्याऐवजी पालक, शिक्षक अथवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. एखाद्या मुलीचा पाठलाग केला जात असेल, वारंवार त्रास दिला जात असेल किंवा सोशल मीडियावरून अश्लील संदेश, फोटो अथवा धमक्या दिल्या जात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांशी सुरक्षेच्या विषयावर समन्वय साधण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले आणि सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गिरी यांनीही महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती केली.
महिला व मुलींना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणांबरोबरच सोशल मीडियावरून होणाऱ्या गैरप्रकारांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. संशयास्पद प्रकार अथवा मुलींना त्रास देण्याची घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही महिला किंवा मुलीला त्रास होत असल्यास ७०७४१००११२ या क्रमांकावर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर मदत मागता येईल.
चौकट:
‘मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिक’
‘मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करू नये किंवा भीतीपोटी तो लपवू नये. शाळा, महाविद्यालय, रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर कोणी त्रास देत असेल तर पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांनीही गैरप्रकार दिसल्यास गप्प न बसता पोलिसांना माहिती द्यावी.’
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर







