राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोन्ही वर्षांतील एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी मिळवले आहेत.
📍नवी दिल्ली
२०२५-२६ या वर्षातही महाराष्ट्रातील कारखान्यांनी विविध विभागांत पुरस्कार पटकावले. ऊस विकासाच्या उच्च उतारा गटात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, सोलापूर याला तृतीय क्रमांक मिळाला. तांत्रिक कार्यक्षमतेत निरा-भीमा सहकारी साखर कारखाना, पुणे प्रथम, तर विलास सहकारी साखर कारखाना, लातूर द्वितीय आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे तृतीय ठरला.
सर्वाधिक साखर उतारा या विभागात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा याला पुरस्कार मिळाला. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) विभागात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली विजेता ठरला. सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना या विभागात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर याची निवड करण्यात आली.
हे दोन कारखाने ठरले देशात सर्वोत्कृष्ट
◼️ २०२४-२५ चा राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे याला मिळाला.
◼️ २०२५-२६ चा राष्ट्रीय स्तरावरील वसंतदादा पाटील पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना याला मिळाला.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात
दोन्ही वर्षांतील पुरस्कारांचा विचार करता महाराष्ट्र २१ पुरस्कारांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातला प्रत्येकी ८ पुरस्कार, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी ५, हरियाणाला ३, कर्नाटक व छत्तीसगडला प्रत्येकी २, तर मध्य प्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी १ पुरस्कार मिळाला आहे.
२२ सप्टेंबरला पुरस्कार वितरण
या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि साखर उद्योगातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


