तालुक्यात रस्सीखेचीचे वातावरण असताना केंदूरमध्ये शांततेत प्रक्रिया पार; सहकार क्षेत्रात सामंजस्याची चर्चा
केंदूर -(प्रतिनिधी दि.20) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या ठरावांची प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी या ठरावांवरून राजकीय आणि सहकारी वर्तुळात चुरस तसेच रस्सीखेचीचे वातावरण पाहायला मिळत असताना केंदूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, केंदूर येथे मात्र ठराव बन्सी शेठ पऱ्हाड यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली.
गावातील ग्रामस्थ आणि संस्थेच्या संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेतल्याने केंदूरमध्ये सहकार क्षेत्रातील एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले. ठरावासाठी कोणतीही वादाची परिस्थिती निर्माण न होता प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
संस्थेच्या संचालक मंडळात अध्यक्षा मीना निवृत्ती साकोरे (चेअरमन), उपाध्यक्ष पऱ्हाड भिवाजी गुलाब (व्हाइस चेअरमन), तसेच गावडे उत्तम बबन, डुकरे नामदेव गवाजी, ताठे गुलाब विठ्ठल, पऱ्हाड मनीषा संदीप, भोसुरे पांडुरंग ज्ञानोबा, साकोरे नवनाथ रामचंद्र, साकोरे भागवत साहेबराव, सुक्रे पंडित नारायण, साकोरे अभिजीत दत्तात्रय आणि साकोरे नवनाथ बबन यांचा समावेश आहे.
या प्रक्रियेत सचिव स्वप्नील शंकर साकोरे आणि अध्यक्षा मीना निवृत्ती साकोरे , माजी सभापती सदाशिवराव थिटे व माजी उपसभापती प्रमोद पऱ्हाड मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने भूमिका बजावली. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा ठराव कोणत्याही वादाविना पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील विविध संस्थांच्या ठरावांवरून राजकीय व सहकार क्षेत्रात चुरस निर्माण झालेली असताना केंदूरमध्ये मात्र सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेत बिनविरोध ठराव केल्याने या निर्णयाची विशेष चर्चा होत आहे. केंदूरचा बिनविरोध ठराव हा सहकार क्षेत्रातील एकमत आणि गावातील सामंजस्याची नवी ओळख ठरला आहे.







