तळेगाव ढमढेरे
प्रतिनिधी:घनश्याम तोडकर
पुणे जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रिगर-2 (पर्जन्य अभाव) निकषानुसार पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 261 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये शिरूर तालुक्याचाही समावेश आहे.
शासन निर्णयानुसार जाहीर झालेले तालुके – भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर.
शेतकऱ्यांना काय मिळणार सवलती?
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये खालील सवलती तात्काळ लागू होणार आहेत:
- शेती कर्ज वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या वीज बिलात सूट
- टंचाईग्रस्त भागात चारा छावण्या आणि पाणी पुरवठा
- रोजगार हमी योजनेच्या कामांना प्राधान्य
शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये यंदा दुबार पेरणीचे संकट आले होते. मका, बाजरी आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर शासनाने दखल घेतल्याने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात लवकरच तहसील कार्यालयाकडून पंचनाम्याचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







