वाघोली
प्रतिनिधी घनश्याम तोडकर
पुणे जिल्ह्यातील ८ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असतानाच पूर्व हवेली परिसर देखील दुष्काळाच्या छायेत असल्याने तो दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार अॅड. अशोक रावसाहेब पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.वडगाव शेरीचे आमदार श्री बापूसाहेब पठारे यांचे समवेत देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले निवेदनाचा सकारात्मक विचार करून पाठपुरावा करणार असल्याचे शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे
माजी आमदार अशोक पवार यांनी २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पूर्व हवेली परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. या भागात फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यंदा अपुरा पाऊस व पाण्याची कमतरता यामुळे फळबागांसह शेती पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. फळबाग हा दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांप्रमाणेच पूर्व हवेली परिसराची पर्जन्यस्थिती असल्याने या परिसराची पाहणी करून पूर्व हवेली परिसर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि संबंधित विभागास सूचना द्याव्यात, अशी विनंती पवार यांनी केली आहे.
दरम्यान, सरकारने कालच पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हे ८ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यात हवेलीचा समावेश नसल्याने पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.







