शिक्रापूर | प्रतिनिधी – घनश्याम तोडकर
शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून १० लाख रुपये लंपास करणाऱ्या चोरट्याचा शिक्रापूर पोलिसांनी तब्बल १२०० किलोमीटर पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस थेट आंध्रप्रदेशातील बिटरगुंटा येथे पोहोचले आणि चोरीतील २ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली.पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे आणि कॉन्स्टेबल मच्छींद्र निचीत यांच्या पथकाने दोन वेळा आंध्रप्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल, बिटरगुंटा येथे शोध मोहीम राबवली. यावेळी संशयित रमेश बाबू गोडेट्टी (रा. कप्पराल टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) याच्या घरातून चोरीतील २ लाख ९० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे येथील फिर्यादी अतुल जेधे यांनी कार बँकेसमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी ही हातसफाई केली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांना आरोपी नेल्लोर जिल्ह्यात असल्याचे समजले.
पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने दोन वेळा आंध्रप्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी रमेश बाबू गोडेट्टी याच्या घरातून रोकड हस्तगत केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.







