शिरूर | प्रतिनिधी – घनश्याम तोडकर
शिरूर तालुक्यात वाढती गुन्हेगारी, गोळीबाराच्या घटना, अवैध धंदे आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने मल्हार बहुजन सेना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महागणपती मंदिर, रांजणगाव गणपती येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी दिली.
याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, तहसीलदार तसेच शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात काय म्हटले आहे?
निवेदनात म्हटले आहे की, शिरूर तालुका औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १८ सप्टेंबर रोजी शिरूर शहरातील लाटेआळी येथे गोळीबारात तरुणाचा मृत्यू, सोनेसांगवी येथे आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केल्याची घटना, रांजणगाव परिसरात कामगारांवर कोयत्याने हल्ला आणि न्हावरे फाटा येथे एसटी बस अडवून लूट यांसारख्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
तसेच तालुक्यात अवैध दारू, जुगार, मटका यासारखे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सर्वात गंभीर प्रश्न महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा असून औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो महिलांना पहाटे व रात्री उशिरा प्रवास करावा लागतो. यादरम्यान पाठलाग, अश्लील शेरेबाजी, मोबाईल व सोशल मीडियावरून त्रास देण्याचे प्रकार वाढले असून याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी निवेदनात केली आहे.
“कायदा व सुव्यवस्था ही केवळ कागदावर नको, तर प्रत्यक्ष नागरिकांच्या जीवनात दिसली पाहिजे. महिला सुरक्षित नसेल तर समाज सुरक्षित नाही,” अशी भूमिका राजाराम दगडे पाटील यांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.






