वाघोलीतील हत्येनंतर शिरूरच्या दिशेने पलायन; शिक्रापूर पोलिसांची कारवाई
शिक्रापूर दि.४( घनश्याम तोडकर)
वाघोली येथे तरुणाचा खून करून शिरूरच्या दिशेने पसार झालेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमा परिसरात वाहनासह ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्याने आरोपींचे पलायन थांबविण्यात यश आले.
वाघोली बाजारतळ मैदानावर (२४ सप्टेंबर रोजी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवनाथ दिंगबर सोन्नर (रा.खळी, ता.गंगाखेड, जि.परभणी, सध्या रा.चौधरी वस्ती, खराडी,पुणे) यांच्यावर आठ जणांनी हल्ला केला. आरोपींनी स्वीफ्ट कारने त्यांना जोरदार धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांसह लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने सोन्नर यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी शिरूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांना मिळाली. त्यांनी तत्काळ शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती दिली. यादव यांनी सपोनी भोसले यांच्यासह पथकाला सतर्क करून पुणे-अहिल्यानगर मार्गावर रवाना केले. पोलिसांनी कोरेगाव भीमा परिसरात सापळा रचून बालाजी सोनाजी घनवटे (वय २२) व नामदेव बाळासाहेब आळनुरे (दोघे रा.वाकलगाव, ता.गंगाखेड, जि.परभणी) यांना वाहनासह ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे खुनानंतर पसार होणाऱ्या आरोपींना काही अंतरावरच रोखण्यात आले. ट्राफिक वॉर्डन जमादार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
याप्रकरणी वाघोली पोलिस ठाणे, पुणे शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५१(२), १८९(२)(४), १९०, १९१(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलिस हवालदार अमोल दांडगे, संदिप बनकर, पोलिस अंमलदार बडे, आव्हाड, केंद्रे तसेच ट्रॅफिक वॉर्डन जमादार यांच्या पथकाने केली.
चौकट:
खुनाच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल ट्रॅफिक वॉर्डन व पोलिस कर्मचाऱ्यांचा शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पेन देऊन सत्कार केला. प्रसंगावधान, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले.






