प्रतिनिधी घनश्याम तोडकर
*तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बसवलेले लाखो रुपयांचे नवीन विद्युत रोहित्र चोरण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला, मात्र गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे हा डाव फसला. ही घटना तळेगाव ढमढेरे – धानोरे रोडवरील घुले वस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
काय आहे नेमका प्रकार?
सध्या ऐन रब्बी हंगामात विजेची मागणी प्रचंड वाढली असून अपुऱ्या दाबामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत, पिके पाण्यावाचून वाळत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने घुले वस्ती येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवीन रोहित्र बसवले होते.
परंतु, रोहित्र बसवूनही खांब आणि तारा जोडण्याचे काम अर्धवटच ठेवण्यात आले. या अर्धवट कामाचाच गैरफायदा घेण्यासाठी चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधला. रोहित्राची किंमत लाखात असल्याने त्यातील तांबे आणि ऑईल चोरण्याचा त्यांचा उद्देश होता.
चोरटे रोहित्र उचकटण्याच्या प्रयत्नात असतानाच काही जागरूक नागरिकांना आवाज आला. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून इतरांना गोळा केले. नागरिकांची चाहूल लागताच चोरट्याने अंधाराचा फायदा घेत शेतातून धूम ठोकली.
शेतकऱ्यांमध्ये संताप
“नवीन रोहित्र बसवून महिना झाला तरी लाईट जोडत नाहीत आणि चोरट्यांसाठी ते उघडे ठेवले आहे. जर हे रोहित्र चोरीला गेले असते तर आमचे अतोनात नुकसान झाले असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरात विद्युत रोहित्र चोरीच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. महावितरणने तातडीने अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून रोहित्र कार्यान्वित करावे आणि तळेगाव ढमढेरे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी होत आहे. या संदर्भात महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा यांच्याशी संपर्क साधला असता सदर कामा साठी कॉन्ट्रॅक्टर ची नेमणूक केलेली आहे मात्र कामासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होण्यासाठी विलंब लागल्याने काम थांबले होते मात्र पुढील आठवड्यामध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्याबाबत कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिले आहेत तसेच विद्युत रोहित्रामधील ऑइल व तारा तसेच केबल चोरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे रात्रीच्या वेळेस अशा घटना घडत असतात त्यामुळे संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ महावितरण अथवा पोलीस स्टेशनची संपर्क करावा असे आवाहन महावितरण वतीने करण्यात येत आहे







