पल्सरवरून गांजाची वाहतूक; २ दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिक्रापूर दि.१३ प्रतिनिधी :-(घनश्याम तोडकर)
गांजाच्या अवैध वाहतुकीविरोधात शिक्रापूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि.१३) रोजी सकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून १ किलो ९०२ ग्रॅम गांजा आणि गांजाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी पल्सर दुचाकी असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सागर हरिभाऊ घुमरे (वय २२, रा.खालुंब्रे,ता.खेड, मूळ रा.आरोळेवस्ती, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) आणि मनीषकुमार मर्निकात प्रसाद सिंग (वय २८,रा.बेगुसराय,बिहार) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित संपतराव मांजरे यांना मंगळवारी पहाटे गुप्त बातमीदारामार्फत गांजाच्या वाहतुकीची माहिती मिळाली. लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोघे गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले. पंचांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित दुचाकीची प्रतीक्षा करू लागले.
सकाळी ८.४० वाजता दुचाकी येताच पोलिसांनी दोन्ही बाजूंनी मार्ग रोखून त्यावरील दोघांना ताब्यात घेतले. दुचाकीच्या हँडलला अडकवलेल्या पांढऱ्या पिशवीत चिकटपट्टीने गुंडाळलेले गांजाचे गाठोडे आढळले. तपासणीत प्लास्टिक पिशवीसह त्याचे वजन १ किलो ९०२ ग्रॅम भरले. पोलिसांनी १ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा आणि ५० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी जप्त केली. हा गांजा नेमका कोठून आणला? तो कोणाला पुरविण्यात येणार होता? आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २० व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख तपास करीत आहेत.
चौकट –
जबरदस्तीने पैसे मागण्यासाठी एका इसमाला दोन आरोपींनी ताब्यात ठेवले त्यांना पोलिसांनी सोडविले. सणसवाडी परिसरात दुकान फोडताना एकाला रंगेहाथ पकडले आणि आता गांजाची वाहतूक करताना 2 आरोपी पकडले आहे. काही संशयित असल्यास तत्काळ 112 वर किंवा 7074100112 यावर शिक्रापूर पोलिसांना कॉल करून मदत घ्यावी –
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक दिनेश कोळी, उमाकांत कुंजीर, पंडित मांजरे पोलिस अंमलदार योगेश आव्हाड, विकास बांगर, नागेश वाघमारे, शरद धुरपते, आत्माराम तळोदे यांनी केली.







